प्रवास…

खरं तर ‘जाणीव’ ट्रस्टची कागदोपत्री स्थापना काही वर्षांपूर्वी झाली असली तरी कार्यरुपी वाटचाल मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी अरविंद सावंत यांनी महानगर टेलिफोन निगम मध्ये स्थानीय लोकाधिकार समितीची स्थापना केली तेंव्हापासुनच झाली. सुरुवातीपासुनच ही संघटना न्यायासाठी झगडत राहिली. १९८६ मध्ये एमटीएनएलने पेपरमधील जाहिरातींद्वारे ३५० कनिष्ठ अभियंता (ज्युनियर इंजिनियर) पदासाठी भरती मोहीम जाहीर केली. या सर्व पदांसाठी उमेदवार निवडले गेले. आश्चर्य म्हणजे या यादीत एकाही भूमीपुत्राची निवड झाली नव्हती. निवड झालेल्या यादीत दाक्षिणात्य उमेदवारांची अधिक संख्या पाहुन अभ्यासू अरविंद सावंत यांनी जरा अधिक तपास केला तेंव्हा धक्कादायक तथ्य प्राप्त झाली.

मद्रास विद्यापीठ आणि दक्षिणच्या काही इतर विद्यापीठांमध्ये जर आपण पदवीची कोणतीही परीक्षा उत्तीर्ण केली असेल आणि परीक्षेत इच्छित गुण किंवा वर्ग प्राप्त केला नसेल तर आपणास सुधारण्यासाठी तीच परीक्षा पुन्हा देण्याची संधी विद्यार्थ्यांना दिली जात होती, त्यामुळे स्वाभाविकच त्यांना अधिक गुण प्राप्त होत असत. परंतु अशी संधी न मिळणाऱ्या इतर उमेदवारांवर हे अन्याय करणारे होते. शिवाय, ते रोजगार विनिमय कायद्याचे उल्लंघन होते. या पळवाटेचा गैरफायदा अन्य प्रांतातील लोक घेऊन भूमिपुत्रांच्या हक्काच्या नौकऱ्यांवर ते डल्ला मारत होते. आणि आपले मराठी विद्यार्थी (त्यापैकी मुठभरच बी. एस्सी. परीक्षेत प्रथम श्रेणी प्राप्त करणारे किंवा अभियंते असायचे) बहुतेक वेळेस गुणवत्तेच्या शेवटी होते. अरविंद सावंत यांनी या त्रुटीवर बोट ठेवले पण व्यवस्थापन त्या उमेदवारांच्या विद्यापीठ पुन्हा परिक्षेस बसून मिळविलेल्या गुणानुसार निवड करण्याच्या त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले. यावर अरविंद सावंत यांनी शिवसैनिकाचा रुद्रावतार दाखवला आणि तीव्र आंदोलन छेडले. भूमीपुत्रांसाठी त्यांनी निषेधार्थ प्रभादेवी येथील तत्कालीन व्हीव्हीआयपी रोड समजला जाणारा वीर सावरकर मार्ग रोखुन धरला. विशेष म्हणजे, ते त्यावेळी नोकरीत होते, हे त्यांनी स्वत:साठी नाही तर भूमीपुत्रांना न्याय मिळवुन देण्यासाठी केले, स्वत:च्या नोकरीची पर्वा न करता ! पोलीसांनी घेरले, अटक झाली, परंतु न डगमगता त्यांनी आंदोलन तडीस नेले. आणि अरविंद सावंत यांनी एका तऱ्हेने इतिहास घडवला, सर्व ३५० पदांवर मराठी भूमीपुत्रांची निवड झाली. संघर्ष करुन १००% मराठी माणसांची भरती करून घेतली. 

लोकसत्ताचे संपादक श्री. माधव गडकरी यांनी “चौफेर” सदरात,  तर नवाकाळकर ‘अग्रलेखाचा बादशहा’ श्री. नीलकंठ खाडिलकरांनी अग्रलेख लिहून अरविंद सावंतांचे तोंड भरून कौतुक केले.  

टेलीकॉम क्षेत्रात क्रांती होत होती आणि अर्थातच एमटीएनएलचा कारभार व्यापक होत होता. परंतु कर्मचारी दुर्लक्षित होते. १९८८ साली महानगर टेलिफोन निगम मध्ये वंदनीय शिवसेनाप्रमुखांच्या आणि विद्यमान मुख्यमंत्री नामदार श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या आशीर्वादाने स्थानीय लोकाधिकार समितीच्या पूढाकाराने अरविंद सावंत यांनी महानगर टेलिफोन निगम कामगार संघाची स्थापना केली. एक वर्ष १५० कार्यालयांना भेट देऊन अरविंद सावंत स्थानीय लोकाधिकार समितीची माहिती देत होते. युनियन स्थापन करण्याचा निर्णय झाल्यावर त्यांनी पुन:श्च १५० द्वारसभा घेतल्या. अन्य युनियन्ससोबत बोलणी करुन त्यांना “महानगर टेलिफोन निगम कामगार संघ” च्या छत्राखाली एकत्र आणले. युनियन मान्यताप्राप्त करून घेतली.  दरम्यान दिल्ली येथे देखील एक युनियन सक्रिय होती. त्या युनियनसोबत १९८९ साली ‘टोकन स्ट्राईक’ केला व त्यास यश प्राप्त झाले. सरकारने १०० रु. तात्पुरती ‘ऑन द स्पॉट’ वेतनात वाढ जाहीर करून अन्य मागण्यांचा सकारात्मक विचार सुरू केला.

महानगर टेलिफोन निगम कामगार संघाचे अध्यक्ष अरविंद सावंत यांनी कामगारांचे जीवनमान बदलल्याशिवाय राहणार नाही असा कर्मचार्‍यांना शब्द दिला होता  आणि न भुतो न भविष्यती असे ऐतिहासिक वेतन करार करुन लाखो कामगारांचेच नव्हे तर त्यांच्या कुटुंबीयांचे जीवन कायमस्वरुपी सुखी करून, दिल्या शब्दाचे पालन केले. आजपर्यंतचा देशातील हा कदाचित सर्वात यशस्वी, सर्वसमावेशक, आस्थापन व कामगार दोहोंच्याही हिताचा सुवर्णमध्य साधणारा करार आहे. आज महानगर टेलिफोन निगमचा एकही कर्मचारी सापडणार नाही ज्याचे स्वतःच्या मालकीचे घर नाही. अगदी तृतीय / चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांची देखील घरकुल उभारण्यासह मुलांना महागडे उच्चशिक्षण देण्यापर्यंतची सर्व स्वप्ने साकार झाली. तब्बल १२ वर्षे सातत्याने झगडून निगमच्या कर्मचार्‍यांना केंद्र सरकारच्या तिजोरीतून निवृत्ती वेतन मिळण्याच्या ऐतिहासिक करारामुळे कर्मचार्‍यांचा वृद्धापकाळ सुरक्षित झाला. ६०,००० कर्मचाऱ्यांच्या आयुष्याचे भले झाले.

१९९० साली महानगर टेलिफोन निगम कामगार संघाने दूरसंचार खात्यातील संपूर्ण देशातील कॅज्युअल लेबर्सना कायम स्वरुपी सेवेत घेण्यास भाग पाडले, त्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांच्या आयुष्याचे भले झाले, त्यांचे जीवन सुरक्षित झाले.

१९९४ ला नाशिक येथे शिवसेनेचे अधिवेशन घेण्याचा निर्णय झाला आणि आदरणीय उद्धवसाहेबांनी ह्या अधिवेशनाची संपूर्ण तयारी करण्याची जबाबदारी सोपवली अरविंद सावंत यांच्यासह महानगर टेलिफोन निगम कामगार संघावर… सर्वांनी दिवस-रात्र मेहनत केली, नियोजनबद्ध आखणीमुळे व सर्वांच्या साथीने हे अधिवेशन ऐतिहासिक ठरले. १९९५ साली निवडणुकीत भगवा फडकला, या विजयश्रीसाठी अरविंद सावंत यांनी आणि कामगार संघाच्या सर्व पदाधिकार्‍यांनी व सदस्यांनी अपार मेहनत घेतली.

कुटुंबप्रमुखाप्रमाणे मटेनिल च्या कर्मचाऱ्यांचीच नव्हे तर त्यांच्या कुटुंबियांची देखील महानगर टेलिफोन निगम कामगार संघाने कायम काळजी केली व कौतुकही केले.

महानगर टेलिफोन निगम लि. मुंबई कर्मचारी सहकारी पतपेढीची रु. २५० कोटीपर्यंत उलाढाल होत असून पगारदार सहकारी पतपेढ्यामध्ये आज ही सर्वोत्कृष्ट पतपेढी म्हणून गणली जाते. अडीअडचणीला सर्व सदस्यांची हक्काची पतपेढी!

गत तीन दशकांहुन अधिक काळ महानगर टेलिफोन निगम कामगार संघ प्रतिवर्षी ‘आदिवासींसोबत दिवाळी’ उपक्रम साजरा करत आहे. मोखाडा तालुक्यातील ४५० कुपोषित बालकांना दत्तक घेऊन ती सुदृढ होईपर्यंत आरोग्य सेवा, औषधे, पौष्टीक आहार देत आहे. कुंभवडे गावातील शंकर महादेव विद्यालयातील विद्यार्थ्यांना देखील कामगार संघाने कायम मदतीचा हात दिला. मुंबईसह महाराष्ट्रातील कुठल्याही आपत्तीमध्ये आर्थिक मदतीसह मनुष्यबळ घेऊन कामगार संघ नेहमी रस्त्यावर उतरलेला आढळेल, मग लातुर किल्लारीचा भुकंप असो वा 26 जुलैची मुंबईतील अतिवृष्टी असो वा सांगली – कोल्हापूर किंवा कोकणातील पूर वा निसर्ग वादळासारखे संकट वा कुठेही आगीसारखी दुर्घटना असो… कामगार संघ तत्परतेने हजर राहुन आपत्तीग्रस्त लोकांना दिलासा देण्यात अग्रेसर.

समाजसेवेसह कला – क्रीडा – संस्कृती – शिक्षण अशा सर्वच क्षेत्रात कामगार संघाची कामगिरी दमदार आहे. शालांत परिक्षेत प्रावीण्य दाखविणार्‍या विद्यार्थ्यांसाठी गत २५ हुन अधिक वर्षे सातत्याने कौतुक सोहळा आयोजित करतानाच मुलांना समाजातील विविध धुरीणांमार्फत मार्गदर्शन देखील उपलब्ध करून देत असते. कुंभवडे गावातील शंकर महादेव विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी कामगार संघ सक्रिय मदत करीत आहे.

अगदी अलिकडील सांगावयाचे झाल्यास, कोरोना आपत्तीने महाराष्ट्राला ग्रासल्यावर जाणीव ट्रस्टद्वारे गोरगरिबांना साहित्य / अन्नधान्य / जीवनावश्यक वस्तुंचे मोठ्या प्रमाणावर वाटप करण्यात आले. आपला सहभाग एवढाच मर्यादित न ठेवता महानगर टेलिफोन निगम कामगार संघातर्फे रु. पंचवीस लाख, महानगर टेलिफोन निगम कर्मचार्‍यांच्या पतपेढीच्या वतीने रु. अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा रु. चा निधी ‘मुख्यमंत्री सहायता निधी कोविड-१९’ साठी सविनय सादर केला.

जाणीव ट्रस्टच्या या समाजकार्याच्या शिरपेचातील एक लक्षणीय तुरा म्हणजे, आदरणीय मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन  ‘जाणीव ट्रस्ट ‘ तर्फे दक्षिण मुंबईमधील रुग्णांच्या सेवेकरिता १२ रुग्णवाहिका  प्रदान करण्यात आल्या. अभिमानास्पद म्हणजे  सदर रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा श्री. उद्धव ठाकरे यांच्या शुभहस्ते, सन्माननीय मंत्री – आमदार श्री. आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे संपन्न झाला. आज या रुग्णवाहिका अनेक रुग्णांना जीवनदायिनी साबित झाल्या याचे ट्रस्टमधील सर्व पदाधिकाऱ्यांना मनस्वी समाधान आहे.

या न्यासातर्फे पुढे समाजकार्य वाढवले जाणार आहे.  गोरगरीबांच्या मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण शक्य झाल्यास मोफत वा माफक दरात ते देण्याचा ट्रस्टचा मनोदय आहे. 

कार्यतत्पर, कार्यनिष्ठ असा जनतेचा ‘आपला माणूस’ श्री. अरविंद सावंत, जाणिवेने भरलेला आणि नेणिवेने साकारलेला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ‘जाणीव’ न्यास आपल्या ब्रीदवाक्यानुरुप वाटचाल करत आहे, मुळांची आणि मूल्यांची जाणीव जपत नेणीवेने !!!

© Janeev Trust 2022 All Rights Reserved.

संपर्क साधा

खासदार श्री. अरविंद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ‘जाणीव’ न्यास वाटचाल करत आहे, मुळांची आणि मूल्यांची जाणीव नेणीवेने जपत!!! आपणही सामिल व्हा समाजसेवेच्या विशाल कार्यात...


Email Us:

mtnksmumbai@gmail.com

Call Us:

+91-22-24163600

Follow Us: